सरकारने आरक्षण दिले तरी जरांगे यांची दादागिरी संपली नाही: भुजबळ विधानसभेत आक्रमक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले तरी मनोज जरांगे यांची दादागिरी संपली नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून आम्हाला विशेषतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अधिकारी वर्गाला आई-बहिणीवरून शिवीगाळ करत आहेत. सरकार या दादागिरीला लगाम घालणार आहे की नाही? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विशेष अधिवेशनात बोलताना केला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला दिलेल्या स्वतंत्र आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंगळवारी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक हातावेगळे करण्यात आले. हे विधेयक एकमताने हातावेगळे करण्यात आले. राज्याचे मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. तसेच ते सरकारचे सर्वच प्रतिनिधी व अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला.

आज मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आमचा त्याला विरोध नाही. पण आज ज्या जरांगेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला, ते सातत्याने धमक्या देत आहेत. मला स्वतःलाही धमक्या देत आहेत. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही आई-बहिणीवरून शिव्या घालत आहेत. तिथे मध्यस्थी करण्यासाठी गेलेले महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांनाही ते तुम्ही भाडखाऊ आहात अशी शिवीगाळ करत आहेत. या दादागिरीला कुणी लगाम घालणार आहे की नाही? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

जरांगेंना पुन्हा आंदोलन करण्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी गत 27 जानेवारीलाच गुलाल उधळला, फटाके फोडले. त्यानंतर पुन्हा 10 फेब्रुवारी रोजी ते उपोषणाला बसले. त्यानंतर आंदोलकांनी अनेक शहरांत बसगाड्या फोडल्या. या राज्यात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. हे थांबायला पाहिजे. आता हे सर्व झाल्यानंतर त्यांचे काय म्हणणे आहे की, मी उपोषण स्थळावरून उठणार नाही. म्हणजे त्यांचे आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तरी त्यांचे आंदोलन थांबणार नाही. यावर आम्ही काही बोलले तर आम्हाला पुन्हा धमक्या मिळतील, असे छगन भुजबळ म्हणाले.

Protected Content