संजय गरूड यांच्या भाजप प्रवेशाची जंगी तयारी ! : जोरदार शक्तीप्रदर्शनाचे नियोजन

मुंबई-विलास अहिरे | जामनेर तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांचा भाजपमध्ये आज दुपारी प्रवेश होत असून याची अतिशय जंगी तयारी सुरू झालेली आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघातील दोन राजकीय विचारधारांचे दोन विरोधी ध्रुव म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते संजयदादा गरूड हे होत. आधी कॉंग्रेस, नंतर राष्ट्रवादी आणि अलीकडेच शरद पवार गटात राहून गिरीशभाऊंना सातत्याने आव्हान देण्याचे काम त्यांनी केले आहे. भाऊंचे वर्चस्व भेदण्यास त्यांना अपयश आले असले तरी तगडी फाईट देण्यासाठी सक्षम असणारे दिग्गज नेते म्हणून त्यांची ख्यात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील ते ना. महाजन यांच्या विरोधात उभे राहतील अशी शक्यता होती. तथापि, काही दिवसांपूर्वीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

यानंतर संजय गरूड यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन आगामी वाटचालीची चाचपणी केली होती. यात त्यांनी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने संजय गरूड हे आपल्या समर्थकांसह आज दुपारी यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रातील भव्य कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: संजयदादा हे दोन दिवसांपासून मुंबईत आलेले आहेत. तर त्यांचे समर्थक हे काल रात्रीपासून मुंबईकडे निघाले आहेत.

आज दुपारी पहिल्या टप्प्यात आजी-माजी जि.प./पंचायत समिती सदस्य, आजी/माजी सरपंच, विकासो चेअरमन/पदाधिकारी आदी तब्बल ३०० महत्वाचे पदाधिकारी हे संजयदादा गरूड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर सोबतीला सुमारे दोन हजार कार्यकर्ते हे देखील जय श्रीरामचा नारा बुुलंद करत भारतीय जनता पक्षा दाखल होणार आहेत.

या स्वागत सोहळ्याची अतिशय जंगी तयारी करण्यात आली आहे. काल रात्रीपासून लक्झरी, क्रूझर, खासगी चारचाकी वाहने असा तब्बल दीडशे वाहनांचा ताफा मुंबईत दाखल झालेला आहे. आज दुपारी भव्य कार्यक्रमात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ. मंगेश चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदींसह जिल्ह्यातील महत्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य तथा दी शेंदुर्णी सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयदादा गरूड यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होणार आहे. याचा रावेर लोकसभा व बर्‍याच प्रमाणात जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम होणार असल्यामुळे या प्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Protected Content