Home Cities जळगाव जागतिक महापौर मंचावर दीपमाला काळे यांचा प्रभावी सहभाग ; ‘फ्युचर-रेडी’ शहराचे व्हिजन...

जागतिक महापौर मंचावर दीपमाला काळे यांचा प्रभावी सहभाग ; ‘फ्युचर-रेडी’ शहराचे व्हिजन मांडले

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर फोरम’ आणि त्यासोबत पार पडलेल्या ‘चौथ्या महिला नेतृत्व कार्यशाळेत’ जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी प्रभावी सहभाग नोंदविला. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी जळगाव शहराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख, विकासाची दिशा आणि भविष्यातील शहराचे व्हिजन देश-विदेशातील मान्यवरांसमोर मांडले. महिला नेतृत्व, लोकाभिमुख प्रशासन आणि शहरी विकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या भाषणातील नेतृत्वविषयक अनुभव आणि विकासाचा दृष्टिकोन उपस्थित महापौरांकडून कौतुकास पात्र ठरला.

आपल्या भाषणात महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहराची ओळख ‘केळीचे शहर’ म्हणून असल्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी जोडलेली ही भूमी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. जळगावची ही ओळख केवळ शहरापुरती मर्यादित नसून तिचा अभिमान जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महापौरपद हे केवळ प्रतिष्ठेचे किंवा मानाचे पद नसून शहरातील प्रत्येक नागरिकाप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला महापौर म्हणून काम करताना विश्वासार्हता सिद्ध करणे, प्रशासनात स्वतःची कार्यक्षमता दाखवणे आणि प्रसंगी कठीण निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात, असे मत काळे यांनी व्यक्त केले. मात्र, नेतृत्व हे केवळ पद किंवा अधिकारावर अवलंबून नसून धाडस, बांधिलकी आणि प्रत्यक्ष काम करून दाखवण्याच्या क्षमतेवर आधारित असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेतृत्व म्हणजे लोकांच्या वर उभे राहणे नव्हे, तर त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सोबत उभे राहणे होय, असे त्यांनी सांगितले.

आपल्या कार्याचे यश पदावरून किंवा अधिकारावरून मोजले जाऊ नये, तर शहर योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हसण्यातून दिसले पाहिजे, असे प्रभावी प्रतिपादन महापौर काळे यांनी केले. नागरिकांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणे आणि शहराच्या विकासात सर्वांना सहभागी करून घेणे हेच खऱ्या नेतृत्वाचे मर्म असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यासाठी महापालिका आयुक्त आणि विविध विभागांतील अधिकाऱ्यांशी मोकळा संवाद, परस्पर आदर आणि सांघिक भावनेतून काम करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरी विकासाच्या प्रक्रियेत महिलांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षितता, शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांची महिलांना जवळून जाणीव असते, असे सांगितले. त्यामुळे महिलांकडे केवळ विकास योजनांच्या लाभार्थी म्हणून न पाहता, निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि शहरी परिवर्तनाच्या सूत्रधार म्हणून पाहिले गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरांच्या विकासाचे नियोजन करताना महिलांचे अनुभव, सूचना आणि नेतृत्व यांना योग्य स्थान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध देशांतील आणि शहरांतील महिला महापौरांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करावी, यशस्वी उपक्रम आणि विकासाच्या कल्पना एकमेकांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच परस्पर सहकार्याचे मजबूत जागतिक नेटवर्क उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले. अशा नेटवर्कच्या माध्यमातून महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळू शकते आणि विविध शहरांतील चांगल्या कार्यपद्धतींचा लाभ इतर शहरांनाही होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेतृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना संदेश देताना महापौर काळे यांनी संधी मिळण्याची वाट पाहत बसण्याऐवजी स्वतःला सक्षम बनवून पुढे पाऊल टाकण्याचे आवाहन केले. आत्मविश्वास, तयारी, मेहनत आणि निर्णयक्षमता यांच्या बळावर तरुणींनी नेतृत्वाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे. स्वतः पुढे जातानाच इतर महिलांसाठी आणि तरुणींसाठीही संधीची दारे खुली करावीत, असे त्यांनी सांगितले.

जळगाव शहराच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडताना त्यांनी शहर स्वच्छ, हरित, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अर्थात ‘फ्युचर-रेडी’ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा वापर केवळ आधुनिकतेचे प्रतीक म्हणून न होता तो नागरिकांच्या सेवेसाठी प्रभावीपणे झाला पाहिजे. विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शहराच्या प्रगतीत सर्व नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘थर्ड वर्ल्ड मेयर फोरम’ आणि ‘चौथ्या महिला नेतृत्व कार्यशाळे’तील सहभागातून महापौर दीपमाला काळे यांनी जळगावच्या विकासाचा दृष्टिकोन जागतिक व्यासपीठावर मांडला. लोकाभिमुख नेतृत्व, महिला सक्षमीकरण, प्रशासकीय समन्वय आणि तंत्रज्ञानाधारित शहरी विकासाचा संदेश देत त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’च्या घोषणेने आपल्या भाषणाचा समारोप केला. त्यांच्या सहभागामुळे जळगाव शहराची ओळख आणि भविष्यातील विकासाचे स्वप्न व्यापक व्यासपीठावर पोहोचले.


Protected Content

Play sound