मुंबई प्रतिनिधी । गेले काही दिवस सतत आपटी खाणाऱ्या निर्देशांकाने आठवड्याच्या अखेरच्या सत्रात, शुक्रवारी (दि.3) जवळपास शतकी वृद्धी साधली. दिवसभरात निर्देशांकाने अनेक चढउतार अनुभवले. निर्देशांकाने सत्रांतर्गत व्यवहारात ३६ हजार ६०७ चा तळ गाठला होता. तर, एका क्षणी तो ३७ हजार ३७५ पर्यंत उसळला होता. मात्र ९९ अंकांच्या वृद्धीसह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेरीस ३७ हजार ११८ वर स्थिरावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १७ अंकांची किरकोळ वृद्धी साधलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने १०९९७ चा स्तर गाठला. ऑटो, आयटी आणि वित्तीय समभागांनी शेअर बाजाराला शुक्रवारी तारले. भारती एअरटेल, एशियन पेण्ट्स, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, एल अँड टी आणि टाटा मोटर्सचे समभाग वधारले. अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर नव्याने वाढीव शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने उभय देशांमधील व्यापारसंघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर निर्देशांकात आणखी घसरण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफपीआय) प्रश्न लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान कार्यालय व अर्थ मंत्रालयाकडून मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह परतला. 5 जुलैला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अति श्रीमंत व्यक्तींवर अतिरिक्त कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या कक्षेत विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी झालेल्या एफपीआयचाही समावेश होत असल्याने या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक माघारी नेण्यास सुरुवात केली आहे. या प्रश्नी सरकार लक्ष घालणार असल्याची बातमी आल्यानंतर निर्देशांकात धुगधुगी निर्माण झाली.