‘अमृत’चे ६२ टक्के कामे पूर्ण : १२ कामे विविध परवानग्यांमुळे खोळंबली

WhatsApp Image 2019 06 18 at 9.34.59 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहराची भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून गणना व्हायची असेल तर अमृतसारख्या योजना गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविणे आवश्यक असून त्यासाठी जळगावकरांनी सहकार्य करायला पाहिजे असे आवाहन करीत विकासक जैन कंपनीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे अमृत योजनेच्या कामातील मूळ उद्दिष्ट, प्रगती आणि सद्यस्थिती याचा वस्तुनिष्ट आढावा पत्रकान्वये दिला आहे. यात पाईपलाईन टाकण्याचे काम जवळपास ६२ टक्के पूर्ण झाले असून विविध १२ कामे वेळेवर मंजूरी अभावी अडकली असल्याचा ठपका विकासकाने ठेवला आहे. यासह कंपनीने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.

 

शहरात खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अमृत योजनेच्या मक्तेदारास कारणीभूत ठरवून असंतोष पसरवला जात आहे. मात्र अमृत योजना ज्या ठिकाणी नाही त्याठिकाणच्या रस्त्यांचीही चाळणी झाली असल्याची स्थिती आहे. अमृत योजनेसंबधीत १२ विकास कामांना येणाऱ्या अडथळ्यांची यादीच विकासकाने प्रसिध्द केली आहे. एचडीपीई पाईपलाईन ५८४ किमी प्रस्तावित असून आतापर्यंत ३६० किमी पाईपलाईन पुर्ण झाली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण, पाईपलाईन आराखडा, रेल्वे व हायवेच्या हद्दीतील कामांची परवानगी, व्हॉल्व्ह संख्या व चेंबरच्या जागांबाबतचा निर्णय, खासगी जागेत पाईपलाईन टाकणे याबाबतचा निर्णय प्रतिक्षेत असल्याने काम संथगतीने होत आहे. लोखंडी पाईपांचा पुरवठा वेळेवर होत नाही तसेच खोदकाम केल्यानंतर उर्वरित माती १५० फुटांच्या पुढे टाकण्याबाबतचा निर्णय आहे मात्र प्रत्यक्षात विकासकास माती दूरवर नेऊन टाकावी लागत आहे, त्याबाबतचा निर्णय प्रतिक्षेत आहे. याशिवाय शहरात नऊ जलकुंभांची उभारणी होत आहे. पाण्याच्या टाक्यांबाबतच्या निविदेतील दराबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने कामाला विलंब होत आहे. तसेच सर्वच ठिकाणी जागेचा ताबा खूपच उशिरा मिळाल्याने विकासकास टाक्यांचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहरात ७५ हजार नळसंयोजन होणार असून आतापर्यंत १३ हजार ५८० नळसंयोजन झाले आहे. अधिकृत नळधारकांची यादी व अपार्टमेंटच्या कनेक्शनबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही माहिती विकासकास पुरविली जात नाही, त्यामुळे अमृतच्या कामास विलंब होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. जळगावकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करीत गुणवत्तापूर्ण कामासाठी सहकार्य करण्याची अपेक्षाही विकासकाने व्यक्त केली आहे.

Protected Content