सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वेवेल मूळचे बिहारी

 

छपरा, (बिहार) : वृत्तसंस्था । छपरामध्ये जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वेवेल रामकलावन यांचा उल्लेख केला. मूळ भारतीय वंशाचे व गोपाळगंजचे सुपुत्र वेवेल रामकलावन सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

वेवेल यांचे पूर्वज छपराचे रहिवासी होते. खुद्द वेवेल यांचा प्रवास हा एका यशस्वीतेची कहाणी आहे. वेवेल यांचे पंजोबा बिहारमध्ये मजुरी करत होते. सेशेल्समध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या मतांनी वेवेल रामकलावन यांनी विजय मिळवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी वेवेल यांचा हा विजय ऐतिहासिक असल्याचं सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान पारंपरिक आणि जवळचे संबंध आणखीन मजबूत करण्याची इच्छा असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

२०१८ साली एका मुलाखतीत बोलताना वेवेल यांनी आपले पूर्वज बिहारमधून मॉरिशसला आणि मग सेशेल्सला दाखल झाल्याचं म्हटलं होतं. सर्वात अगोदर आजोबांच्या जन्माचा दाखला आपल्याला मॉरिशसमध्ये मिळाला होता. त्यामुळे, पलायन करून आपले आजोबा इथवर पोहचलेले मजूर असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. मॉरिशसच्या ‘महात्मा गांधी इन्स्टिट्युट’मुळे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील परसौनी गावात आपलं मूळ असल्याचं वेवेल यांना समजलं होतं.

१८८३ मध्ये आपल्या पंजोबांनी बिहारमधलं आपलं मूळ गाव सोडलं होतं. सर्वात अगोदर ते पाटण्याला गेले, त्यानंतर ते कलकत्याला दाखल झाले. त्यानंतर १२ आठवडे प्रवास करत समुद्राच्या मार्गाने ते मॉरिशसला दाखल झाले. इथं एका उसाच्या शेतात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर पणजी आणि दोन मुलं सेशेल्सला निघून गेले आणि तिथंच स्थायिक झाले, असं भारतात केलेल्या एका भाषणात त्यांनी सांगितलं होतं.

Protected Content