सिल्व्हर ओकवर हल्ल्यास भाजपची फुस : राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचार्‍यांनी हल्लाबोल केल्याची अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओककडे धाव घेत या प्रकरणाचा  निषेध करून भाजपवर आरोप केला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दुपारी एसटी आंदोलक कर्मचारी अचानक धडकले. यातील आंदोलकांनी शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी सिल्व्हर ओकवर दगडफेक आणि चप्पलफेकदेखील करण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांच्या अवस्थेला पवार काका-पुतणे हेच कारणीभूत असल्याचा आरोप एसटी आंदोलकांनी केला असून याप्रसंगी जोरदार धुमश्‍चक्री झाली. तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही वेळानंतर वातावरण निवळले.

दरम्यान, हा प्रकार घडला तेव्हा सुप्रिया सुळे या एसटी कर्मचार्‍यांना सामोर्‍या गेल्या. मात्र आंदोलकांनी त्यांचे काही ऐकले नाही. यानंतर पोलीस कारवाईने वातावरण शांत झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिल्व्हर ओककडे धाव घेतली. यात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादीने निषेध केला असून यामागे भाजपची फुस असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

Protected Content