आरक्षणासाठी नक्की कुठाला ठोकायचे : शिवसेनेचा सवाल

मुंबई । मराठा आरक्षणप्रश्‍नी दोन्ही छत्रपतींमध्ये कोणतेही वाद नसून ते समाजाच्या हितासाठी झटत आहेत. यातच हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणार्‍यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्‍नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे असे प्रतिपादन आज शिवसेनेने केले आहे.

मराठा आरक्षणावरून सुरू असणार्‍या घडामोडींवर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही राजे आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही. सध्या श्री. मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढार्‍यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही.

यात पुढे नमूद केले आहे की, सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली. समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकर्‍यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणार्‍यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्‍नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे.

या पुढे म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा गुणवत्ता आणि आर्थिक निकष हीच भूमिका मांडली. अर्थात, बदलत्या परिस्थितीत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली आहे. आता सातारच्या छत्रपतींच्या संतापाचा भडका उडाला व सर्व समाजांचेच जातनिहाय आरक्षण रद्द करून गुणवत्ता, आर्थिक निकष यावरच आरक्षण ठरवा ही भूमिका त्यांनी घेतली. सातारा तसेच कोल्हापूरच्या राजांनी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळयांनीच घेतली पाहिजे. जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content