चला, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूया ! : किरीट सोमय्या

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब  यांचे दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी यावे असे आवाहन ट्वीटरवर केले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी लिहिलं, “26 मार्च – चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केलं आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर सतत त्याचा पाठपुरावा केला होता.

दरम्यान, या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचे अनिल परब यांनी याआधीच स्पष्ट केले होते. किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीला मी उत्तर दिले आहे. सरकारने ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे त्यांना नोटीस दिली आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले होते.

Protected Content