Home Cities मुक्ताईनगर दोन महिने झाले तरी पोस्टाची पत्रे पोहोचेनात; मुक्ताईनगर पोस्ट ऑफिसविरोधात नागरिक संतप्त

दोन महिने झाले तरी पोस्टाची पत्रे पोहोचेनात; मुक्ताईनगर पोस्ट ऑफिसविरोधात नागरिक संतप्त

0
5


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या टपाल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याची अपेक्षा असते, मात्र मुक्ताईनगर पोस्ट कार्यालयाच्या कथित ढिसाळ व मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. साध्या पोस्टाने पाठविलेली महत्त्वाची पत्रे तब्बल दोन महिने उलटूनही संबंधित व्यक्तींपर्यंत न पोहोचल्याने टपाल सेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी साध्या पोस्टाच्या पत्रांची कोणतीही जबाबदारी घेण्यास थेट नकार देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्पीड पोस्ट किंवा महागड्या कुरिअर सेवेचा खर्च न परवडणाऱ्या गरीब नागरिकांनी साध्या पोस्टाने पत्र पाठवल्यास “साध्या पोस्टाची जबाबदारी आमच्याकडे नाही” असे उडवाउडवीचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक पत्रव्यवहार वेळेत न पोहोचल्याने सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होत असून पोस्ट विभागाच्या या बेजबाबदार भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर येथील रहिवासी देवेंद्र काटे यांनी याबाबत आपली आपबिती सांगताना स्पष्ट केले की, त्यांनी गत १० जुलै रोजी साध्या पोस्टाने १५ महत्त्वाची पत्रे पाठविली होती. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे दोन महिने उलटल्यानंतरही मुक्ताईनगर शहरातील तीन पत्रे संबंधित व्यक्तींना मिळालेली नाहीत. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या अगदी जवळ असलेल्या पत्त्यावर पाठवलेले पत्रही अद्याप पोहोचलेले नाही. याव्यतिरिक्त पुणे, जळगाव, भुसावळ, बोदवड व बऱ्हाणपूर येथे पाठविलेल्या पत्रांचा पाठपुरावा केला असता, साध्या पोस्टाच्या पत्रांबाबत कोणतीही नोंद किंवा माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.
एकीकडे डिजिटल भारत आणि टपाल सेवा सक्षमीकरणाच्या बाता मारल्या जात असताना, दुसरीकडे मुक्ताईनगर पोस्ट ऑफिसच्या अशा कारभारामुळे गोरगरीब जनतेने दाद कोणाकडे मागावी, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, गहाळ पत्रांचा शोध लावावा आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून नागरिकांना योग्य न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुक्ताईनगर पोस्ट कार्यालयातून १० जुलै रोजी पाठवलेली साध्या पोस्टाची पत्रे दोन महिने उलटूनही पोहोचली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कर्मचाऱ्यांकडून साध्या पोस्टाची जबाबदारी नाकारली जात असल्याने टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound