मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून संशयकल्लोळ सुरू असतांनाच आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका कधी होणार हे फक्त परमेश्वर आणि न्यायालयाच माहित असल्याचे सांगितले होते. यामुळे निवडणुकांबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमिवर, मुख्यमंत्री कार्यालयाने नेमक्या निवडणुका कधी होणार ? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे, असं काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त तथ्यहीन आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसदर्भात निर्णय घेणार असल्याचे यात स्पष्टपणे नमूद केले आहे. यामुळे निवडणुकीचा चेंडू हा न्यायालयाच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.