बुलढाणा जिल्हा कँसरमुक्त करण्याचा मानस – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलढाणा प्रतिनिधी । कॅन्सर अर्थातच कर्करोग, या आजारामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेकांचा मृत्यू होतो. कॅन्सरवर अद्यापही प्रतिबंधक लस मिळालेली नाही. परंतु जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अशा स्वरूपाचे अभियान राबवून बुलढाणा जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

यासंदर्भात स्थानिक विश्रामगृह येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे व त्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती केल्यास व याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो असा विश्वास कँसर प्रकल्पाचे सल्लागार  डॉ नंदकुमार पानसे यांनी यावेळी व्यक्त केला. 

कॅन्सर वरील उपचारास मोठ्याप्रमाणात खर्च येतो. हा उपचार खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असून जिल्ह्यात कॅन्सर जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास बुलढाणा जिल्ह्यातील लाखों सामान्य लोकांना याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे अभियान बुलढाणा  जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीस कँसर प्रकल्पाचे सल्लागार डॉ. नंदकुमार पानसे, विजया दुलंगे, प्रदीप सोळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी लाड, सह.जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते.

Protected Content