पाचोरा येथील शितल पाटील यांची स्पेनमधील जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी निवड

पाचोरा प्रतिनिधी । स्पेनमधील सांतियागो शहर दर ५, ६ आणि ११ वर्षांनी जेकबिन वर्ष साजरा करतो. सालाबादप्रमाणेच यावर्षीही हा सण साजरा करण्यात येत असून जगभरातील विविध कलाकार महोत्सवासाठी निवडले जातात. तथापि, पाचोरा येथील शितल पाटील यांची जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी अल्फ कामिनो दि सांतियागो या आंतरराष्ट्रीय संस्थेने निवड केली आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर या पवित्र वर्षामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात व आपल्या सर्व चुका परमेश्वर माफ करून देतो अशी मान्यता आहे. म्हणून या वर्षाला पवित्र वर्ष ज्याला की जाकोबिओ वर्ष असे संबोधले जाते. अल्फ कामिनो दि सांतियागो या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत या वर्षी जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी कलाकारांची निवड करून त्याठिकाणी रांगोळी रेखाटण्यात आली. जवळपास ३० देशांमधून २८० शहरांमधून रांगोळी कलाकार या उत्सवासाठी निवडले गेले होते. भारतामधून सांगलीचे आंतरराष्ट्रीय रंगावलीकार किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पाचोरा येथील रंगावलीकार शितल पाटील यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करून ही रांगोळी साकारून हा सोहळा साजरा केला. आयोजकांनी दिलेल्या थीमवर आधारित रांगोळी रेखाटन करुन यामध्ये शितल यांनी सहभाग नोंदवला. रांगोळी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याचे पाहून पाचोरासह परिसरांमधून शितल पाटील यांचे खुप कौतुक होत आहे.

जागतिक पातळीवर भरारी घेतल्यामुळे त्यांचे आई – वडील नातेवाईक यांना त्यांचे फार कौतुक वाटत आहे. यावेळी या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल शितल पाटील यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

 

Protected Content