Home आरोग्य जामनेरमध्ये वाचनालयाचे उद्घाटन ; रुग्णवाहिका लोकार्पण उत्साहात

जामनेरमध्ये वाचनालयाचे उद्घाटन ; रुग्णवाहिका लोकार्पण उत्साहात

0
4


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत जामनेर येथील साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानतर्फे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात पार पडला. संत गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर येथे आयोजित या कार्यक्रमात साक्षात वानर हनुमान वाचनालयाचे उद्घाटन, नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प.पू. शामचैतन्य बापू, अध्यक्षस्थानी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, तर प्रमुख वक्ते म्हणून निलेश चव्हाण उपस्थित होते. याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गजानन मंडवे सर, नगरसेवक बाबुराव हिवराळे, ब्रह्मकुमारी आश्रमच्या सुषमा दीदी तसेच प्रतिष्ठानचे सदस्य विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व शुभेच्छा देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख वक्ते निलेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ देत इतिहास हा स्वाभिमानाने जगणाऱ्यांचा लिहिला जातो, असे प्रतिपादन केले. साडेतीनशे वर्षांनंतरही शिवरायांचा इतिहास समाजाला प्रेरणा देत असून नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प.पू. शामचैतन्य बापू यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि संस्कार यांवर मार्गदर्शन करत युवकांनी सकारात्मक जीवनमूल्ये स्वीकारावीत, असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आत्मसात करून समाजनिर्मितीत योगदान देण्याचा संदेश त्यांनी दिला.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गजानन मंडवे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांचा प्रभावी संगम घडवून आणल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान वाचनालयाच्या उभारणीसाठी विविध मान्यवर व दात्यांनी मदतीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय, तोंडापूर यांच्या वतीने ११ हजार रुपयांची रोख देणगी प्रदान करण्यात आली. नगरसेवक बाबुराव हिवराळे यांनीही ११ हजार रुपयांची देणगी जाहीर करून वाचनालयाच्या कार्याला पाठबळ दिले. काही दात्यांनी वर्षभरासाठी वर्तमानपत्रांची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माळी यांनी केले. नाना सातवे यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, तर राहुल चव्हाण यांनी संपूर्ण अभियानाचा उद्देश, आर्थिक लेखाजोखा, खर्चाचा तपशील आणि आगामी योजनांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. जितू कुमावत यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, दीपक पवार, ईश्वर चवरे, प्रशांत भोई, जयवंत पर्वते, सोपान लोहार, भोला निकम, डॉ. पंकज माळी, अमोल इंगळे, अक्षय पवार, रामेश्वर पाटील, ईश्वर चौधरी, शंकर सातवे, भरत ठाकरे, विजय शिवदे, सुदर्शन वराडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound