अखेर प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकरांचा राजीनामा

जळगाव प्रतिनिधी | कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती वरिष्ठ पातळीवर न मागता पोहचवल्याने गोत्यात आलेले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यामुळे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ एस आर भादलीकर यांनी विद्यापीठात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची गोपनिय माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयात तोंडी मागणी केल्यावरून माहिती पाठविली. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन देऊनही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन केले. कालच्या आंदोलनानंतर प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. या अनुषंगाने आज प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले आहे.

या आंदोलनात कृती गटाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव भैय्या पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, दुर्योधन साळुंखे, अनिल पाटील, संजय सपकाळे, अजमल जाधव, महेश पाटील, अमृत दाभाडे, जगदीश सुरळकर, आर.एम.पाटील, गोकुळ पाटील, विलास बाविस्कर, सुरेखा पाटील, वैशाली वराडे, जयश्री शिनगारे, विठ्ठल पाटील, आर.डी.पाटील, डी.बी. बोरसे, शिवाजी पाटील, भीमराव तायडे, रवि फडके, सुनिल निकम, यांच्यासह इतर कृती समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारणांसाठी दिला प्रभारी कुलसचिवांनी राजीनामा ! :

* विद्यापीठ कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ व्यक्तीला दिली.

* कर्मचारी कृती गटाने भादलीकर हे विधी अधिकारी या पदावर कायम नाहीत जो व्यक्ती खालच्या पदावर कायम नाही त्याला प्रभारी कुलसचिव पदावर नेमणे कसे चुकीचे आहे हे कुलगुरूंना पटवून दिले व तसेच भादलीकर यांचे पद न्यायप्रविष्ट असल्याचेही सांगितले प्रत्येक बाब न्यायप्रविष्ट कशी होईल या पद्धतीने परिस्थिती हाताळतात हा मुद्दा देखील प्रभावी ठरला.

दरम्यान, भादलीकर यांच्या जागी डॉ. ए. बी. चौधरी हे प्रभारी कुलसचिव बनणार आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed.

error: Content is protected !!