महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजातील दुर्लक्षित घटकांचा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर तो सर्वांगीण पातळीवर व्हायला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन  समिती व्यक्तींच्या दैनंदिन आयुष्यातील विषय हाताळून दुर्बल, दुर्लक्षित, मागास घटकांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. हे खरेच उल्लेखनीय आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरदेखील मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन सनदी अधिकारी राजेश पाटील यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक जळगावात् दि. १३ व १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात मूळचे जळगावचे आणि ओडिसा कॅडरचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी राजेश पाटील, मूळचे जळगाव येथील व सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेले डॉ. संग्राम पाटील (लंडन) यांनी उपस्थिती दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.  प्रसंगी मंचावर राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चौघे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशीलकर, संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमिवंत धांडे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, तिन्ही जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, प्रल्हाद बोऱ्हाडे, विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकातून संजय बनसोडे यांनी, समितीच्या कामकाजाविषयी माहिती सांगून पुढील उपक्रमांना मान्यवरांनी उपस्थिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ. नितीन शिंदे लिखित “दोस्ती ग्रह-ताऱ्यांशी”, वार्षिक दिनदर्शिका, “अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका” चे मान्यवरांनी केले. यावेळी “बाऊलचा निनाद” या चमत्काराचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी प्रा. डी. एस. कट्यारे, सुधीर निंबाळकर यांनी परिचय करून दिला.

राजेश पाटील म्हणाले, अनेक अधिकारी प्रशंसनीय काम करीत आहेत. त्यांच्या सहकार्याने समाज प्रगती साधली गेली पाहिजे. प्रशासकीय-सामाजिक एकत्रीकरणातून सुंदर समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. समिती सातत्याने ते काम करीत आहे, हे चांगले आहे, असेही ते म्हणाले. तर डॉ. संग्राम पाटील म्हणाले की, मनुष्याचा विवेक हा शाळेमधून येत नाही. तर तो शाळा, घर आणि समाजामधून येतो. विवेकाच्या बैठका घेता येतील का ते बघावे. विवेकवादी लोकांनी संघटित व्हावे. अशा कार्यकर्त्यांनी जास्त स्मार्ट पद्धतीने अजून जायला हवे. वारकरी संप्रदाय हा विवेकाचा वाहक आहे. समाज प्रश्नांसाठी कधीपर्यंत लढायचे याचा विवेक आपल्यात आला पाहिजे, असेही ते म्हणाले.

माधव बावगे यांनी सांगितले की, समितीच्या विविधांगी उपक्रमात प्रशासकीय अधिकारी आपल्यासोबत असतात. मात्र समाजातील अनेक घटक गैरसमजातून  विरोध करत असतात. परिवर्तनासाठीची लढाई आता ३४ वर्षांची झाली असून समितीच्या कामाचा विस्तार झाला आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार सुनील वाघमोडे यांनी मानले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची  बैठकीचा समारोप रविवारी दुपारी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या. प्रसंगी बैठकीचे उत्तम नियोजन केल्याबद्दल जळगाव जिल्हा व शहर शाखेचे राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. सामाजिक सुधारणेचे काम करताना काहींचा विरोध होतोच. मात्र तो विरोध झुगारून देत संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे नेण्याचे काम समिती करीत असल्याचे प्रतिपादन प्रतिभा शिंदे यांनी केले. राज्य कार्यकारिणी बैठकीचा आढावा संजय बनसोडे यांनी घेतला. तर पुढील चार महिने समितीच्या विविध उप्रक्रमांविषयी थोडक्यात सांगून आपण निर्धाराने पुढे जात राहूया असे मार्गदर्शन राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केले. हम होंगे कामयाब गीताने समारोप झाला.

दोन दिवस राज्य कार्यकारिणीसाठी जिल्ह्यातील दीपक मराठे, भीमराव दाभाडे, फिरोज शेख, ऍड. भरत गुजर, डॉ. अयुब पिंजारी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. मोहिनी मोरे, बी. आर. पाटील, प्रा. दिलीप भारंबे, अशोक तायडे, मीनाक्षी चौधरी, सुशीला चौधरी, शोभा बोऱ्हाडे, शिरीष चौधरी, रमेश गायकवाड, पिरन अनुष्ठान, संदीप मांडोळे, आर. एन. भदाणे, अरुण दामोदर, डी. आर. कोतकर, अनिल पाटील, संतोष गौड, शहर शाखेचे कार्याध्यक्ष कल्पना चौधरी, कार्यवाह गुरुप्रसाद पाटील, प्रा. आर. ए. पाटील, जितेंद्र धनगर, आनंद धिवरे, हेमंत सोनवणे, आर. एस. चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content