नाते आधी. . .राजकारण नंतर ! : किशोरआप्पा व वैशालीताईंचे रक्षाबंधन

पाचोरा-नंदू शेलकर | शिवसेनेतील फुटीनंतर पाचोर्‍यातील पाटील कुटुंबही दोन बाजूंमध्ये दुभंगले असले तरी आज रक्षाबंधनाच्या दिवशी ही कटूता गळून पडल्याचे दिसून आले. आपले बंधू किशोरआप्पा पाटील यांना बहिण वैशालीताई सूर्यवंशी यांनी ओवाळून नाते हे राजकारणापेक्षा मोठे असल्याचे दाखवून दिले.

 

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात घडलेल्या घटनांचे जळगाव जिल्ह्यातही मोठे इफेक्ट झाले. यात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शिंदे गटाची वाट धरली. तर, काही दिवसांनी त्यांची चुलत बहिण तथा माजी दिवंगत आमदार आर.ओ. तात्या पाटील यांची कन्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी आपण ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहत राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केली. यामुळे भावाविरूध्द बहिण अशी राजकीय लढाई सुरू झाली. यातच तात्यांच्या नावे असणारे शिवालय हे आप्पांचे संपर्क कार्यालय वैशालीताई यांनी घेऊन तिथूनच संपर्काला सुरूवात केली. यामुळे बहिण-भावात कटुता निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र आज रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्णपणे वेगळे चित्र दिसून आले.

 

वैशालीताई सुर्यवंशी यांनी भाऊ आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ओवाळून राखी बांधली. यावेळी राजकारणापेक्षा नाते सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

Protected Content