रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर निराधार बहिणीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

पहूर , ता . जामनेर – रवींद्र लाठे | रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक. पहूर बस स्थानक परिसरात उघड्यावर जीवन जगणाऱ्या एका निराधार मातेसह ४ महिन्यांच्या चिमुकलीस  पहूर येथील पत्रकार, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माणुसकीचे दर्शन होऊन चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा आश्रमाचा आधार मिळाला आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून पहूर बसस्थानक परिसर आणि भाजीपाला बाजार परिसरात एक महिला उघड्यावरच उदरनिर्वाह  करत होती.  बस स्थानक परिसरातील व्यावसायिक तिला देतील ते खाऊन ती आपले पोट भरत होती. अशातच तिने एका मुलीला जन्म दिला. सदर आई आणि मुलगी अतिशय वेदना सहन करताना पाहून  पहुर येथील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांचे चिरंजीव वैभव लाठे , पत्रकार जयंत जोशी व बबलु कोचेटा  यांचे हृदय पानावले. त्यांनी चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा संस्थेचे संचालक नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून  त्यांनी सदर महिलेसह चिमुकलेला आपल्या आश्रमात सामावून घेण्यासाठी होकार दर्शविला .

खाकीतील माणुसकीचे दर्शन  

पहूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी सदर निराधार महिलेसह चार महिन्यांच्या चिमुकली मानव सेवा संस्था आश्रमात दाखल करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्वतः व  आपल्या पोलीस ईश्वर देशमुख, गोपाल माळी व होमगार्ड कर्मचार्यांसह  बस स्थानक परिसरात उपस्थित राहून निरोप दिला .

रक्षाबंधनाची भेट ! अशी ही आगळी वेगळी भेट 

सदर बहिणीसह चिमुकलीला पहूर येथील भावंडांनी नवे कपडे देऊन चोपडा येथील नरेंद्र पाटील यांच्या मानव सेवा आश्रमात जाण्यासाठी निरोप दिला. जळगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कवी कासार यांनी रुग्णवाहिकेद्वारे  या असहाय महिलेस मानव सेवा आश्रमात रवाना केले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी, बजरंग दलाचे कार्यकर्ते भैया कुमावत,  राहुल पाटील ,  विजय होळकर , शिवभक्त रंगनाथ महाराज, सागर बारी, संजय थोरात, ललित देवरे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, पत्रकार  शंकर भामेरे,पत्रकार  रविंद्र लाठे, संतोष पांढरे  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका असहाय बहिणीला रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील यांच्या मानव सेवा संस्था आश्रमाचा आधार मिळाल्याने या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. या घटनेमुळे आजही माणुसकीचा झरा जिवंत असल्याचे जाणवले .

 

Protected Content