यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी तडवी भिल समाजाच्या वतीने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल रशीद तडवी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी विविध समित्यांची स्थापना करून मिरवणूक व अन्य कार्यक्रमांची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली.
यावल येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीस सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रशीद तडवी अध्यक्षस्थानी होते. बैठकीत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांचा सहभाग वाढविणे, सांस्कृतिक परंपरा जपणे आणि समाजातील ऐक्य अधिक मजबूत करणे यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीत उत्सव समितीची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी अब्दुल रशीद तडवी, उपाध्यक्षपदी सलीम सुभान तडवी, कवी बिराज विनोद तडवी व अलीशानबाई कादर तडवी यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी हनीफ अप्पा तडवी यांची जबाबदारी सोपविण्यात आली. उपस्थितांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीचे सूत्रसंचालन नवाज तडवी यांनी केले. यावेळी रशीद तडवी, मासूम तडवी, किरण तडवी यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी समाजातील युवकांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
येत्या ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणूक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत, मिरवणूक, शिस्त, सांस्कृतिक, प्रसिद्धी आणि नियोजन अशा विविध समित्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समितीवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवून कार्यक्रमाचे नियोजन अंतिम करण्यात आले. यंदाचा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि समाजाच्या व्यापक सहभागातून साजरा करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.



