Home धर्म-समाज यावल आगारातून सावखेडा सिमच्या वारकऱ्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान 

यावल आगारातून सावखेडा सिमच्या वारकऱ्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान 

0
14

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील वारकरी संप्रदायातील भाविकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विशेष बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजित या यात्रेला धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, ग्रामस्थांनी भाविकांना शुभेच्छा देत बसला उत्साहात निरोप दिला.

गावातील जिजाबराव यादव पाटील, कमलाकर भास्कर पाटील, सुपडू बोमटू पाटील, दिनेश विश्राम पाटील तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून सुमारे ४० महिला व पुरुष भाविकांसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यावल आगाराच्या सहकार्याने ही विशेष बस सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी पंढरपूरकडे रवाना झाली. यात्रेपूर्वी ग्रामस्थांच्या वतीने बसची विधिवत पूजा करण्यात आली. सौ. ललिता मुरलीधर पाटील आणि महिला भगिनींनी धार्मिक विधी पार पाडत यात्रेच्या शुभारंभाला मंगलमय वातावरण निर्माण केले. यावेळी बसचे चालक माळी आणि वाहक मुरलीधर पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते वसंत गजमल पाटील आणि भूषण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फुलांच्या हारांनी सजविलेल्या यात्रेच्या बससमोर अजय पाटील यांनी नारळ फोडून यात्रेला शुभारंभ केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता, सेवा, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा अध्यात्मिक वारसा असल्याचे सांगत या परंपरेचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. भाविकांना पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन लाभावे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि सामूहिक प्रार्थनेमुळे गावात सुख, समृद्धी व सर्वांचे कल्याण नांदावे, अशा सदिच्छाही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यात्रेसाठी रवाना होणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound