जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वतःच्या वडिलांना यकृतदान करून जीवनदान देणाऱ्या एका उच्चशिक्षित मराठी तरुणीची समाजमाध्यमांवर बनावट छायाचित्राद्वारे बदनामी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी तसेच त्याच्यासह या कटात सहभागी असलेल्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
अलीकडेच स्वतःच्या वडिलांना यकृतदान करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या एका उच्चशिक्षित व प्रतिष्ठित मराठी कन्येची समाजमाध्यमांवर बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित तरुणीचा राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बनावट छायाचित्र तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोंदी खुर्द येथील भरत बालाजी मस्के या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असले, तरी या गुन्ह्यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी अधिक सखोल तपासाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. या निवेदनात आरोपीची नार्को टेस्ट करून या गुन्ह्यामागील सूत्रधार, सहकारी आणि संपूर्ण कट उघड करावा, तसेच संबंधित सर्वांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या सचिवांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या या बनावट आणि आक्षेपार्ह मजकुरामुळे संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमुळे समाजात महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचत असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर आणि धाकदायक कारवाई होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. दोषींना कठोर शिक्षा झाल्यास समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य संदेश जाईल आणि महिलांविरोधातील अशा सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.



