


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली भागातून चोरीला गेलेली दुचाकी शोधण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला (डीबी टीम) मोठे यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील एका संशयित चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची स्प्लेंडर कार हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील शेरा चौक, रझा कॉलनी (मेहरून) येथील रहिवासी रमजान खान बाबु खान यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक MH-19 DY 4874) अजिंठा चौफुलीवरील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर पार्क केली होती. ते वैयक्तिक कामासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांची ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी रमजान खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने अजिंठा चौफुली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली. या तपासाअंती पोलिसांना संशयित आरोपीची ठोस माहिती मिळाली. पथकाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी सुप्रिम कॉलनी परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले.
तुलसीराम काल्पासिंग कास्दे (वय २८, मूळ रा. झाकस, ता. भैसदेही, जि. बेतुल, मध्य प्रदेश; सध्या रा. प्लॉट नं. ३४, गट नं. १६७/१, सुप्रिम कॉलनी, शारदा शाळेजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने इदगाह कॉम्प्लेक्ससमोरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली ३५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



