


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना विविध क्षेत्रांची माहिती देण्याच्या उद्देशाने यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात येत्या मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘महाकुंभ रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल आणि जे. डी. एम. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एकाच छताखाली थेट नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी. बी. पाटील आणि डॉ. एस. आर. गायकवाड यांनी दिली आहे.
या भव्य रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या, व्यावसायिक आस्थापना, सहकारी संस्था, बँका तसेच वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती (Direct Interviews) घेतल्या जातील. मुलाखतींमधून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना त्याच दिवशी प्रत्यक्ष नियुक्तीपत्र (Appointment Letter) प्रदान केले जाणार असल्याची माहिती रोजगार निवड समिती अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी दिली.
या महाकुंभ रोजगार मेळाव्याचा यावल परिसरातील जास्तीत जास्त इच्छुक आणि पात्र तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने २९ सप्टेंबर रोजी सकाळी जे. डी. एम. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य पी. बी. पाटील व प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांनी केले आहे.



