जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बाल न्याय मंडळ, जळगाव येथे न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने सी.आय.एस. (Computerized Information System) संगणकीय माहिती प्रणाली सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बालगृहातील मुलांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती जोशी यांनी सकारात्मक विचार, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा न्यायालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा महिला व बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी बालगृहातील मुलांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मनाची तयारी आणि जिद्द असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. अभ्यास आणि योग्य माहितीच्या माध्यमातून मनातील भीती दूर होते. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ज्ञान संपादन केल्यास जीवनात यशस्वी वाटचाल करता येते.

कार्यक्रमात नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सीआयएस संगणकीय माहिती प्रणालीमुळे बाल न्याय मंडळातील प्रकरणांची नोंद, माहिती व्यवस्थापन, दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि न्यायप्रक्रियेतील कामकाज अधिक वेगवान व सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले. या सुविधेमुळे न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जिल्हा न्यायाधीश-६ आर. एस. साळगावकर, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. टी. घोगले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. एस. बुद्रुक, उपविभागीय अधिकारी चव्हाण, पोलीस उपविभागीय अधिकारी गणापुरे, बाल व महिला कल्याण विभागाचे अधिकारी, बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. निंबाळकर, बाल न्याय मंडळाचे सदस्य, जिल्हा न्यायालयातील कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, बालकेंद्रित न्यायप्रक्रिया अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी सीआयएस प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



