Home Cities भुसावळ SIR मोहिमेत १०० टक्के मतदार पुनरीक्षण पूर्ण करत किन्ही तालुक्यात प्रथम

SIR मोहिमेत १०० टक्के मतदार पुनरीक्षण पूर्ण करत किन्ही तालुक्यात प्रथम

0
6

किन्ही (डॉ. नितु पाटील, विशेष प्रतिनिधी) । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) आणि बूथ सक्षमीकरण मोहिमेत भुसावळ तालुक्यातील किन्ही गावाने उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावातील तिन्ही मतदान केंद्रांचे १०० टक्के मतदार पुनरीक्षण, डिजिटल मॅपिंग, प्रपत्र भरणे आणि निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सर्वप्रथम पूर्ण करून किन्ही गावाने संपूर्ण तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल राज्याचे मंत्री तथा भुसावळचे आमदार संजयभाऊ सावकारे यांनी तिन्ही बीएलओंचे दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केले.

विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक मतदाराची गृहभेट घेऊन पडताळणी करणे, अनमॅप मतदारांची नोंद करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच सर्व माहिती डिजिटल पद्धतीने निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अत्यंत अचूकतेने पार पाडण्यात आले. किन्ही गावातील तिन्ही बूथवरील हे काम वेळेआधी पूर्ण झाल्याने गावाने भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला. यादी भाग क्रमांक २६३ मध्ये एकूण ९५२ लोकसंख्येचे अचूक पुनरीक्षण व डिजिटल मॅपिंग करत बीएलओ ओंकार एकनाथ पाटील यांनी आपले बूथ शंभर टक्के पूर्ण केले. यादी भाग क्रमांक २६४ मध्ये ८५९ लोकसंख्येचे काम नियोजित वेळेत पूर्ण करून बीएलओ गिरीश ज्ञानदेव चौधरी यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. तर यादी भाग क्रमांक २६५ मध्ये ८९९ लोकसंख्येच्या मतदार यादीचे संपूर्ण काम तांत्रिक अचूकतेने पूर्ण करत बीएलओ रुपेश सुनील नेहेते यांनीही आपले बूथ अव्वल स्थानावर आणले.

या तिन्ही यादी भागांमधील एकूण २,७१० लोकसंख्येची गृहभेटीद्वारे पडताळणी, अनमॅप मतदारांचे पुनरीक्षण आणि नवीन मतदार नोंदणीचे काम या तिन्ही बीएलओंनी नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे पूर्ण केले. त्यांच्या मेहनतीमुळे किन्ही गावाने तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वप्रथम शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल मंत्री तथा आमदार संजयभाऊ सावकारे यांनी किन्ही गावातील बीएलओ ओंकार पाटील, गिरीश चौधरी आणि रुपेश नेहेते यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या तिन्ही कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत राष्ट्रीय महत्त्वाचे काम वेळेच्या आधी पूर्ण केले आहे. तालुक्यातील इतर सर्व बूथ प्रमुख आणि बीएलओंनीही किन्ही गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले काम लवकरात लवकर शंभर टक्के पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मोहिमेत बीएलओंसोबत किन्ही गावच्या सरपंच सौ. नीलमताई सोनवणे यांचे पती सचिन (दादा) सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कडू सुरवाडे, शक्ती केंद्रप्रमुख कृणाल येवले, पोलीस पाटील राजू तायडे तसेच ग्रामस्थांनीही सक्रिय सहकार्य केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे सांगण्यात आले. भुसावळ विधानसभा क्षेत्रातील SIR मोहिमेत सर्वोदय हायस्कूल, किन्ही यांच्या कार्यक्षेत्रानेही प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे संपूर्ण किन्ही गावाचे तालुकाभर कौतुक होत असून, लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणाऱ्या या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound