कृषीमित्र हरिभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त अभियंत्यांचा सत्कार

फैजपुर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या अभियंते, प्रकल्प सल्लागार आणि तांत्रिक टीम यांचे अमोल हरिभाऊ जावळे यांनी  हरिभाऊ जावळे मित्र परिवरामार्फत सत्कार करून आभार मानले.

 

यावल, भुसावळ, या क्षेत्रातील  बळीराजा अन् धरणीमातेचे ऋण फेडण्याचा ध्यास घेऊन  माजी खासदार व आमदार स्व .हरिभाऊंनी अथक परिश्रम घेत जे शेतकरी हितासाठीचे कार्य केले. त्यामुळे आज शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न खरोखर अवतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले. या स्वप्नपुर्तीच्या वाटचालीस सुरुवात होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तालुक्यासह संपुर्ण शेळगाव बॅरेजच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी वरदान असणारे शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मागणीने बंद करण्यात आले  त्यात आतापर्यंत अंदाजे ३ घन मीटर पर्यंत पाणी साठा साठवण  झाला आहे.

शेळगाव प्रकल्पासाठी स्व. हरिभाऊ जावळे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सन १९९९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली होती. तेव्हा १९८.५ कोटींच्या प्रकल्प होता. मात्र २०१२ पासून काम बंद होते.  त्यावेळी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा करत  सुधारित किमतीनुसार ६९९ कोटी ४८ लाख खर्चासाठी शासनाने मान्यता मिळवून घेतली.  सोबतच त्यावेळी ना.गुलाबाराव पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून कामास गती मिळाली.  आता सध्या स्थितीत प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम ९५% पूर्ण एवढे पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसर सुजलाम सुफलाम होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या अभियंते, प्रकल्प सल्लागार आणि तांत्रिक टीम यांचे अमोल हरिभाऊ जावळे यांनी कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण हरिभाऊ जावळे मित्र परिवरामार्फत सत्कार करून आभार मानले.

यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता  य. का. भदाणे , तांत्रिक सल्लागार पी. आर.पाटील , कार्यकारी अभियंता स. रां.भोसले , उपविभागीय अधिकारी  हेमंत डी. सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उमेश फेगडे, गणेश नेहते, पुरुजीत चौधरी,  नारायण बापू चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, मुन्ना पाटील, सविता भालेराव, विजय मोरे, सागर कोळी, राकेश फेगडे, व्यंकटेश बारी ,मधुकर नारखेडे, प्रदीप कोळी, संदीप सोनवणे , भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व संपूर्ण मित्र परिवार व लाभ क्षेत्रातील विविध गावातील गावकरी उपस्थित होते.

सर्वांनी मानले ना.गिरिश महाजन यांचे आभार

यावेळी  अमोल हरिभाऊ जावळे यांनी ना. गिरीश महाजन यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत सर्वांमार्फत त्यांचे आभार मानले. याप्रसंगी ना.गिरिश महाजन यांनी या प्रकल्पावर आधारित उपसा जलसिंचन या सारख्या विविध प्रकल्पांचे काम लवकरात लवकर सुरुवात करून चालना देऊ असे आश्वासित केले.

 

Protected Content