भारतीय राजकीय पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा – मोदी

pm modi 2

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) आज राज्यसभेत मांडले जाणार असून चर्चेसाठी सहा तासांचा अवधी देण्यात आला आहे. विधेयक राज्यसभेत सादर होण्याआधी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात ही बैठक होत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विधेयकाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका केली असून अनेक राजकीय पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा असल्याचे म्हटले आहे. तसेच विधेयकामुळे अनेकांचे आयुष्य बदलून जाईल असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.

 

लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहातही या विधेयकावर वादळी चर्चा होणे अपेक्षित आहे. लोकसभेत तब्बल आठ तासांच्या आरोप—प्रत्यारोपांच्या फैरीनंतर हे विधेयक सोमवारी मध्यरात्री संमत करण्यात आले होते. राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल, असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. अनेक विरोधी नेते नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर बोलणार असून यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन आणि समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांचा त्यात समावेश आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला सोमवारी शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करताच काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशाचा पाया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली तर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली होती. आज राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत संमत होईल अशी आशा आहे.

Protected Content