सावधान : कोरोना सारख्याच नवीन व्याधीचे आगमन; गुरांमधून होतो प्रसार

नवी दिल्ली । एकीकडे कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडालेला असतांना अगदी याच प्रमाणे घातक असणार्‍या ब्रुसेलोसिस हा नवीन आजार समोर आलेला आहे. गुरांच्या माध्यमातून याचे अतिशय वेगाने संक्रमण होत असून चीनमध्येच याचे पहिले रूग्ण आढळून आले आहेत.

उत्तर-पश्‍चिम चीनमधील हजारो लोक ब्रुसेलोसिस या एका जीवाणूजन्य (बॅक्टेरिया) आजाराने संक्रमित झाले आहेत. चीनी सरकारी माध्यम असणार्‍या ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २४ जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२० या काळात झोंग्मु लांझाउ बायोलॉजिकल फार्मास्युटिकल कंपनीने जनावरांच्या वापरासाठी तयार करण्यात येत असलेल्या लस उत्पादन प्रक्रियेत कालबाह्य झालेले जंतूनाशक वापरले. त्यामुळे उत्पादन आंबवण्याच्या टाकीमधून वाया जाणार्‍या गॅसचे अपूर्ण निर्जंतुकीकरण झाले. आंबवलेले द्रव वाहून नेताना वाया जाणारा गॅस जीवाणूयुक्त एरोसोल तयार करतो आणि उत्पादन कालावधी दरम्यान या प्रदेशातील वार्‍याच्या दिशेनुसार या जीवाणूचे संक्रमण झाल्याचे सांगण्यात आले.

ब्रुसेलोसिस हा कोरोना प्रमाणेच एक घातक आजार असून, गाई व म्हशींमध्ये प्रामुख्याने हा आढळून येतो आणि त्यांच्याकडून मानवामध्ये संक्रमण होते. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येण्यामुळे ब्रुसेला हा जीवाणू मनुष्याच्या शरीरात पसरतो. ताप, थंडी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा ही आजाराची मुख्य लक्षणे आहेत.

जगभरात सध्या कोरोनामुळे कोट्यवधी लोक बाधीत झाले असून याचा कसा प्रतिकार करावा याच्या चिंतेत शास्त्रज्ञ व जगभरातील सरकारे आहेत. यातच आता याच प्रमाणे संक्रमीत होणारी नवीन व्याधी आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Protected Content