गुलाबभाऊ करणारे अंधारेंची टिकेची परतफेड ! : वाघमारेंच्या प्रवेशात मोलाची भूमिका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | सुषमा अंधारे यांनी धरणगावात केलेल्या शेलक्या टिकेची फिट्टमफाट करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट त्यांच्या विभक्त झालेल्या पतींनाच गळाला लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाप्रबोधन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. याच सभेत शरद कोळी यांनी शेलक्या शब्दांमध्ये त्यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. महाप्रबोधन यात्रेच्या चार दिवसांमध्ये अंधारे आणि पाटील यांच्यात जोरदार वाद रंगला होता. तर, मुक्ताईनगरातील सभा रद्द केल्यानंतर देखील सुषमा अंधारे आक्रमक झाल्या होत्या. या नंतर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक चकमकी सुरू होत्या. यानंतर आज थेट सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली.

दरम्यान, वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश घेण्याआधीच आपण गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांच्या पुढाकाराने बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेत असल्याचे सांगितले होते. तसेच आपण गुलाबभाऊंच्या गावात जाऊन सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. अर्थात, वाघमारे यांचा प्रवेश हा गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने झाला असून ते पहिली तोफ हे जळगावला येऊन डागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टिकेची फिट्टमफाट करण्यासाठी त्यांनी ही रणनिती आखल्याचे अधोरेखीत झाले आहे. वाघमारेंनी तर चार दिवसातच जळगावला येण्याचे जाहीर केल्याने आता राज्याच्या राजकारणातील पुढचा अंक हा जळगावात घडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Protected Content