सुप्रीम कॉलनीतील पाणी चाचणीचा ‘श्री गणेशा’ (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीतील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली असून जोडणीसह सर्व काम पूर्ण झाले आहे. श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्ताला महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमीगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली असता ती यशस्वी ठरल्याने सुरळीत पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुप्रीम कॉलनीवासियांना गेल्या १२ वर्षात कधीही नियमीत पाणीपुरवठा झालेला नसून आजही त्यांचे पाण्यासाठी हाल होतात. सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत नव्याने पाणीपुरवठा यंत्रणा बसविण्यात आली असून भूमीगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली आहे. अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम नुकतेच संपले असून पंप बसविणे आणि इतर किरकोळ, तांत्रिक कामे देखील पूर्ण झाले आहे. सोमवारी सुप्रीम कॉलनीत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमीगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, चंद्रकांत भापसे, मनपा अभियंता, योगेश बोरोले, शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

दीड तासात भरणार भूमीगत साठवण टाकी

मुख्य जलवाहिनीवरून पाणी सोडल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात पाणी भूमीगत टाकीत पोहचले. मुख्य जलवाहिनीचा केवळ १० टक्के व्हॉल्व्ह उघडला तरी भूमीगत टाकी भरायला केवळ दीड तास अवधी लागणार आहे. टाकीची पूर्णता साफसफाई करून दोन दिवसात नागरिकांच्या नळाला पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीत पाईपलाईनमध्ये काही घाण अडकली असल्यास ती निघून सर्व अडथळे दूर होणार आहेत.

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/131784292075511

भाग २

https://www.facebook.com/508992935887325/videos/769417350651586

Protected Content