Home Cities मुक्ताईनगर हरिनामाच्या गजराने संतभूमी कोथळी दुमदुमली ; एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सप्ताहाचा दुसरा...

हरिनामाच्या गजराने संतभूमी कोथळी दुमदुमली ; एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सप्ताहाचा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात

0
12


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवी अर्थात ७५व्या पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा दुसरा दिवस अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि संत मुक्ताईंच्या जयघोषाने संपूर्ण कोथळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे काकडा आरतीने झाली. काकडा आरतीचे सुश्राव्य स्वर, श्री विष्णू सहस्रनामाचा जयघोष आणि श्री संत मुक्ताई यांच्या चरित्र वाचनाने मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. पहाटेच्या पवित्र वातावरणात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून आरती व चरित्रवाचनाचा लाभ घेतला. यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बबनराव महाराज आंबेकर यांचे प्रवचन झाले. आपल्या ओघवत्या आणि भावपूर्ण वाणीमधून त्यांनी अध्यात्माचे महत्त्व, संत परंपरेची शिकवण आणि भक्तीमार्गाचे महत्त्व उपस्थित भाविकांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

मध्यान्ही श्री संत मुक्ताईंच्या कृपाप्रसादाचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला. त्यानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. श्री. खगेन्द्रजी महाराज (शहादेकर) यांच्या रसाळ निरूपणातून संगीत श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला. संगीताच्या तालासोबत त्यांच्या प्रभावी कथनशैलीने भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. भागवत कथेच्या माध्यमातून अध्यात्मिक विचार आणि संत परंपरेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला. सायंकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिपाठ संपन्न झाला. ‘भानूकुळ भूषण’ संत मुक्ताईंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. रात्री ह.भ.प. अंकुश महाराज न्हागरे (गेवराई, बीड) यांच्या ओघवत्या आणि ज्ञानपूर्ण वाणीतून कीर्तन सोहळा रंगला. विठ्ठल नामाचा गजर, टाळांची चिपळी आणि मृदुंगाच्या ठेक्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला परिसरासह पंचक्रोशीतील वारकरी, भाविक भक्त आणि माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो भाविक या ज्ञानयज्ञात सहभागी होत असून संत मुक्ताईंच्या चरणी नतमस्तक होत अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे संतभूमी कोथळी जणू भक्तीच्या वैकुंठधामात रूपांतरित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा पुढील दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ज्ञानयज्ञाचा आणि भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound