Home Cities अमळनेर झाडी येथील जि. प. शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत अनोखा...

झाडी येथील जि. प. शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत अनोखा वृक्षारोपण उपक्रम 

0
9


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वातावरणातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक बांधिलकीचे भान जपत, अमळनेर तालुक्यातील झाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात एक आगळावेगळा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.

या स्तुत्य उपक्रमासाठी गावातील सामाजिक भान जपणारे अध्यापक विलास पाटील यांनी आपल्या दिवंगत आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेला विविध प्रकारची झाडे व रोपे सस्नेह भेट दिली. या रोपांची लागवड शाळा परिसरात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. आईच्या स्मृती कायम जतन करण्यासोबतच निसर्गाचे संरक्षण करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. वृक्षारोपण प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जैतपीर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा जगताप मॅडम, विशेष शिक्षक रेखावर्डे मॅडम, गावातील दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र सुरेश पाटील, तसेच शाळा सुशोभीकरणात सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल राजपूत, निंबा पाटील, आणि विजय पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पंकजदादा यांच्यासह समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक पठाण सर, उपशिक्षिका श्रीमती भदाणे मॅडम आणि झाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी वृक्षारोपणासोबतच या रोपांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची शपथ घेतली. शालेय परिसरात हिरवळ वाढवून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रप्रमुख श्रीमती जगताप यांनी व्यक्त केला, तर गावकऱ्यांनी आणि शाळा प्रशासनाने अध्यापक विलास पाटील यांच्या या सामाजिक आणि संवेदनशील उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.


Protected Content

Play sound