छत्रपती संभाजीनगर येथे होणार 19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगर येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि भाषातज्ञ डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. अशोक राणा हे 18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. या प्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष इंजि. सतिश चकोर आणि निमंत्रक धनंजय बोरडे उपस्थित होते.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत असून महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठवलेल्या पत्राचा आधार घेत विचार मांडते. विद्रोही चळवळ समतावादी संस्कृती व साहित्य विचारांचा पुरस्कार करत आली आहे. या चळवळीच्या वतीने विविध ठिकाणी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. डॉ. अशोक राणा हे मराठी साहित्य, भाषा, इतिहास, लोकसंस्कृती, संत वाङ्मय, आधुनिक समीक्षा, चित्रकला, नाट्य अशा विविध विषयांमध्ये संशोधन करणारे प्रसिद्ध अभ्यासक आहेत. त्यांनी आतापर्यंत 76 पुस्तके लिहिली असून त्यांच्या लेखनात ऐतिहासिक संशोधन, भाषाशास्त्र, मिथक आणि लोकसंस्कृती यांचा समावेश आहे.

Protected Content