मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वांत लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू आहे. यासाठी आजपासून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन योजनेचे निकष तपासणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते.

परंतु समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील महिला व बाल कल्याण विभाग लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहे. यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सास-यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्यांना फटका बसणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आगामी काळात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची तपासणी करणार आहेत, त्यानंतर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे.
लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी आहे. मात्र जास्त उत्पन्न असलेल्या आणि आयकर भरत असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अर्जांची पडताळणी होणार आहे. त्यानुसार आयकर भरणा-या महिलांना यातून वगळले जाणार आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सात हप्त्यांचे एकूण १०,५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा १५ तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे. या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचे सांगितले जात आहे. तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.