Home राजकीय “शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू”; काँग्रेस जिल्हाध्यक्ष...

“शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू”; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा इशारा!


सावदा/रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात करण्यात आलेल्या कपातीवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एमएसईबी विभागाने रात्रीच्या वेळी जंगल फिडरवरील वीजपुरवठा आठ तासांवरून दोन तासांनी कमी केल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी दिला आहे.

एमएसईबी विभागामार्फत नुकतीच रात्रीच्या वेळेस जंगल फिडरवरील वीजपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना साधारण आठ तास वीजपुरवठा मिळत होता, मात्र वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर वाढल्याचे कारण देत आता हा पुरवठा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर थेट परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात विशेषतः रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील केळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कापणी आणि नवीन लागवडीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतीला पाणीपुरवठा अत्यावश्यक असून, वीजपुरवठा कमी झाल्यास सिंचन व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत नाजूक असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, खतांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत वीज कपातीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांवर आणखी एक आर्थिक भार टाकण्यासारखा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देताना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी शासन आणि एमएसईबी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तात्काळ ही वीज कपात मागे घेऊन पूर्ववत आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू करावा. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound