बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरातील नियमित पूजा-अर्चनेसाठी आवश्यक पूजासाहित्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या धार्मिक परंपरेत प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पक्षाने स्वतःहून पूजासाहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला असून याबाबत नगरपंचायतीला थेट इशारा दिला आहे.
बोदवड नगरपंचायतीकडून मंदिरातील दैनंदिन पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवण्यात आल्यानंतर हा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोदवड शहराध्यक्ष प्रदीप शांताराम बडगुजर यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत पत्र सादर केले आहे. जर नगरपंचायतीला पूजासाहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसेल, तर आमच्या पक्षाच्या वतीने हे साहित्य स्वेच्छेने पुरवले जाईल, अशी स्पष्ट तयारी त्यांनी पत्राद्वारे दर्शवली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या सरकारी किंवा शासकीय निधीचा वापर केला जाणार नसून, सर्व खर्च पक्षाकडून स्वेच्छेने केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

श्री रेणुका माता मंदिर हे बोदवड शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून तेथील धार्मिक परंपरा सुरळीत चालणे ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. या विषयात राजकारण बाजूला ठेवून धार्मिक परंपरा अखंडित राहिली पाहिजे, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. या निर्णयाबाबत मंदिराचे पुजारी राजेश सुभाष जोशी यांनादेखील अवगत करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने याप्रकरणी आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामदैवताच्या मंदिरासारख्या अत्यंत संवेदनशील आणि श्रद्धेच्या विषयात अनावश्यक प्रशासकीय अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर यांनी केला आहे. पूजासाहित्याचा पुरवठा करण्याची मुख्य जबाबदारी नेमकी कोणाची आहे, यासाठी नगरपंचायतीच्या बजेटमध्ये काय तरतूद आहे आणि सध्या साहित्य पुरवण्यात काय अडचण येत आहे, याचा खुलासा प्रशासनाने नागरिकांसमोर करावा, असे त्यांनी नमूद केले.



