यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजा भालोद, ता. यावल येथे आदिवासी लाभार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेकडो आदिवासी बांधव तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, कुटुंब आणि समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आदिवासी भागातील महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग तसेच व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक स्वावलंबन हीच खरी प्रगती आहे,” असे सांगत आमदार जावळे यांनी महिलांनी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा आणि व्यवसायाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगारनिर्मिती आणि उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे महिला बचत गटांनी उद्योग-व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मेळाव्यात १ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. संबंधित बचत गटांना निधी वितरणाबाबत प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले. या निधीचा उपयोग बचत गटांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी तसेच लघुउद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्ननिर्मितीसाठी करता येणार आहे. मेळाव्यात महिला बचत गटांची स्थापना, बँक लिंकेज, विविध शासकीय योजना, आर्थिक सक्षमीकरण आणि उद्योग-व्यवसायाच्या संधी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकारी व प्रतिनिधींनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांची माहिती केवळ देण्यापुरती मर्यादित न ठेवता पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने मेळाव्यातच विविध योजनांसाठी आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे स्वीकारण्यात आली.
मेळाव्यात प्राप्त झालेल्या अर्जांची नियमानुसार छाननी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारण्याची गरज कमी होऊन लाभार्थ्यांना योजनांच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळण्यास मदत झाली. आरोग्य विभाग तसेच महसूल विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी श्रीमती रेहाना जुम्मा तडवी यांनी महिला बचत गटांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्यांनी महिलांच्या विविध मागण्या, अडचणी तसेच बचत गटांसमोरील प्रश्न प्रशासनासमोर मांडले.
कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, यावलच्या तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांच्यासह प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, पुरवठा विभागाचे चव्हाटे, संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाचे मनोज खारे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, भदाणे, ग्रामपंचायत अधिकारी जनार्दन पाटणकर तसेच आदिवासी विकास निरीक्षक ज्ञानेश्वर कुमावत, विश्वास गायकवाड, विकास पाटील, कृष्णा पाटील, विनोद पडोळे, प्रवीण भिमटे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेवक व सेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि योजनांची थेट माहिती मिळाल्याने आदिवासी लाभार्थ्यांसाठी हा मेळावा उपयुक्त ठरला.



