जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी सप्ताहानिमित्त मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रूशिल मल्टीपर्पज फाऊंडेशन आणि अपंग सेवा मंडळ संचलित मूक-बधिर विद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या समावेशक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय व्हावा तसेच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
विद्यापीठ परिसरात पार पडलेल्या या चित्रकला स्पर्धेत एकूण ७५ मूक-बधिर विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छ भारत आणि गांधीजी’, ‘गांधीजींच्या चष्म्यातून भारत’ आणि ‘मोहनदास ते महात्मा’ हे तीन विशेष विषय ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि निसर्गदत्त कलात्मक अभिव्यक्तीतून महात्मा गांधींचे विचार आणि जीवनप्रवास कागदावर हुबेहूब रेखाटला. मूक-बधिर विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींनी उपस्थितांची मन जिंकली असून, सामाजिक समावेशकता आणि समान संधीच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

या प्रसंगी महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे विभागप्रमुख डॉ. उमेश गोगडीया यांच्यासह अपंग सेवा मंडळ संचलित मूक-बधिर विद्यालयांचे मुख्याध्यापक प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेचे निष्पक्ष परीक्षण श्री. शिवम हुजूरबजार आणि श्रीमती निशात अब्दुल रज्जाक यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके समन्वयन प्रा. मोईन शेख यांनी सांभाळले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. योगेश माळी यांनी पार पाडली.
सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मूक-बधिर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा व मूल्यांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.



