
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नीट परीक्षा घोटाळा, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या इंधन समस्यांसह विविध मुद्द्यांवरून जळगाव शहरातील शास्त्री टॉवर चौकात भाजप सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या कारभारावर कठोर टीका करत विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गापर्यंत सर्वच घटक त्रस्त असल्याचा आरोप केला.

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे अनेक विद्यार्थी आणि पालक मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी काही भ्रष्ट प्रवृत्ती खेळत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
यावेळी महानगर जिल्हा अधीक्षक जमील शेख यांनी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, नीट परीक्षेसाठी विविध शहरांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळामध्ये मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच बस भाडे पूर्णपणे माफ करावे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल सरकारने सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजप सरकारने सुरुवातीला फक्त दोन ते तीन रुपयांच्या दरवाढीची माहिती माध्यमांद्वारे दिली, मात्र त्यानंतर दररोज एक ते दीड रुपयांनी इंधन दरवाढ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. इंधन पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी वर्गासाठी शेतीकामात डिझेल हा अत्यावश्यक घटक असून, वाढत्या दरांमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक डिझेल सुरळीत आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
शास्त्री टॉवर चौकात झालेल्या या आंदोलनात विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.



