जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भुसावळ येथील महिलेचा उपचारादरम्यान मंगळवारी 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, मूळ रा. निरुळ, ह. मु. भुसावळ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळातील साई शंकर नगरात चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य वास्तव्यास होते. ६ मार्च रोजी ते भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. यामुळे दुचाकीवरील त्यांच्या पत्नी रागिणी पाटील या रस्त्यावर कोसळल्या, मात्र त्याचवेळी त्यांचा हात व पाय ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या हाताला व पायाचा अक्षरश चेंदामेंदा होवून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर जखमी झालेल्या रागिणी पाटील यांना तात्काळ पुणे येथील सैनिकांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले. याठिकाणी त्यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मंगळवारी 11 मार्च रोजी दुपारी १२ सुमारास त्यांची उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.