लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या! एसीबीची धडक कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. पशूपक्षी फार्मा दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी अन्न व औषधे प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी चक्क ८ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पंटरला रंगेहात पकडले. या कारवाईत औषध निरीक्षक देशमुख यांच्यासह पंटरला अटक करण्यात आली असून, दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर येथील एका व्यापारी संकुलात तक्रारदाराने भाड्याने गाळा घेतला होता. या गाळ्यात त्यांना पशूपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. या अर्जाबाबत तक्रारदार आणि त्यांच्या आतेभावाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयात औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी देशमुख यांनी तक्रारदाराला सांगितले की, ते शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह ४ मार्च रोजी त्यांच्या दुकानावर स्थळ पाहणी करतील. त्यासाठी तुषार जैन यांना ८ हजार रुपये द्यावे लागतील.

या लाच मागणीमुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन या तक्रारीची पडताळणी केली. औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खासगी इसम तुषार जैन यांच्यासह तक्रारदाराच्या दुकानावर स्थळ पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी तुषार जैन यांनी तक्रारदाराकडे ८ हजार रुपयांची लाच मागितली. या लाच मागणीला औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला.

लाचेची रक्कम धुळ्यातील पारोळा चौफुलीवर देण्याचे ठरले होते. त्यानुसार, ११ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने पारोळा चौफुलीवर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तुषार जैनला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

Protected Content