अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गावाशेजारील तलावाचे खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून 30 लाख रुपये खर्चाची पाझर तलाव दुरुस्ती योजना मंजूर केली आहे.
11 मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या तलाव दुरुस्तीमुळे पाणी साठवण क्षमता वाढून भूजल पातळीत वाढ होणार आहे. कोरड्या झालेल्या विहिरींमध्ये पाणी साठून गावाला पाणीपुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या तलाव दुरुस्तीमुळे पिंपळे खुर्द, चिमणपुरी, पिंपळे, वाघोदे, खडके या पाच गावांना फायदा होणार आहे. उन्हाळ्यात या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तलाव दुरुस्तीमुळे ही गावे टँकरमुक्त होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना शेतीत टाकल्यास उत्पादन वाढेल, असे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी सांगितले.
पिंपळे खुर्द येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात पिंपळे खुर्द, बुद्रुक, वाघोदे, खडके, चिमणपुरी या पाच गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच वर्षा युवराज पाटील, ठेकेदार अनिल साठे, तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, योगिता दिनेश पाटील, माजी सरपंच दिनेश प्रेमराज पाटील, पिंपळे बुद्रुकचे सरपंच अपेक्षा राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, डॉक्टर विलास पाटील, जयवंत पाटील, गोकुळ पाटील, पुरुषोत्तम चौधरी, नारायण पाटील, पंडित पाटील, सतीश दुला पाटील, आधार पाटील, कमलेश पाटील, हरीलाल पाटील आदी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.