मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना मोठा दिलासा देत पक्षावरील मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी वाढीव मुदतीला मंजुरी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडतांना या पक्षावर आपला मालकी हक्कदेखील दाखविला आहे. या संदर्भात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू असून यातील एकमेकांच्या विरोधातील पाच याचिकांची एकत्रीत सुनावणी ही सुप्रीम कोर्टाने अलीकडेच घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडेही या प्रकरणी सुनावणी सुरू होती. यात आयोगाने उध्दव ठाकरे यांना पक्षावरील मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी दोन आठवण्यांची मुदत दिली होती. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांना चार आठवड्यांची मुदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.