हैदराबाद वृत्तसंस्था । तेलंगणा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला पशूवैद्यक डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी कालच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. या एन्काऊंटरचे सर्वत्र स्वागत करण्यात आले असले तरी पोलिसांच्या भूमिकेवर टीकादेखील होऊ लागली आहे. या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तातडीने सुनावणी करून तेलंगणा उच्च न्यायालयाने या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.