शिंदी येथे आहार वाटपात तफावत : अंगणवाडी सेविकेला खुलाशाचे आदेश

भुसावळ, प्रतिनिधी  । तालुक्यातील शिंदी गावाच्या अंगणवाडी केंद्रातील आहार साठ्यात तफावत असल्याची तक्रार उपसरपंच कैलास पाटील यांनी  केली असता बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेला तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

शिंदी येथील उपसरपंच कैलास पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या गावातील अंगणवाडी केंद्रात प्राप्त व वाटप आहारात तफावत असल्याची तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दुरध्वनीद्वारे केली होती. यानुसार मंगळवार १८ मे रोजी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांनी उपलब्ध साठा व वाटप रजिस्टरची तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. रजिस्टरमध्ये नमूद साठा व वाटप  व शिल्लक साठा यात मोठ्या प्रमाणत तफावत आढळून आली. त्यातच लाभार्थ्यांची स्वाक्षरीबाबत देखील शंका उपस्थित करण्यात आली आहे. यातून शासनाने दिलेले आहार वाटपबाबतच्या सूचनांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. आहार प्राप्त झाल्यापासून २ दिवसात वाटप करण्याचे शासनाचे आदेश असतांना ९ एप्रिल व ५ मे चा आहार वाटप करण्यात आलेला नसल्याचे आढळून आले आहे. कोरोना काळात ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत तीन दिवसात खुलासा सादर करण्याची नोटीस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका यांना बजावली आहे.

Protected Content