आता विश्‍वचषक एक पाऊल दूर : भारताची फायनलमध्ये धडक !

मुंबई-वृत्तसेवा | विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या जोरदार खेळीनंतर मोहंमद शमीने केलेल्या भेदक गोलंदाजी मुळे भारताने न्यूझीलंडला उपांत्य फेरीत नमवत विश्‍वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये विश्‍वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करतांना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला जोरदार सुरूवात करून दिली. रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने फटकेबाजी केली. मात्र तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर विराट आणि श्रेयसने सूत्रे हाती घेतली.

विराट कोहलीने प्रारंभी शुभमनला साथ दिली. यानंतर मात्र त्याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने आज सचिनचा २००३च्या विश्‍वचषकातील सर्वाधीत ६७३ धावांचा विक्रम मोडीत काढला. यासोबत त्याने सचिनच्या एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांचा रॅकॉर्ड मोडत पन्नासावे शतक झळकावले आहे. ११३ चेंडूंमध्ये तब्बल ११७ धावा फटकावत तो बाद झाला. मात्र याआधी त्याने भारताला सुस्थितीत पोहचवले.

यानंतर श्रेयस अय्यरने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने १०५ धावा केल्या. तर के. एल. राहूलने त्याला समर्थ साथ दिली. भारताने चार बाद ३९७ धावा केल्या होत्या.

यानंतर मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने सावध सुरूवात केली. पहिल्या गड्यासाठी कॉन्वे आणि राचिन रवींद्र हे मोठी भागीदारी उभारण्याच्या तयारीत असतांना मोहंमद शमी याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर कॉन्वेला बाद केले. यानंतर त्याने राचिन रवींद्र याला देखील तंबूत पाठविले. यानंतर मात्र केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल या जोडीने डाव सावरला. त्यांनी तिसर्‍या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी पार केली. यात मिचेलने शतक केले. तर विल्यमसन हा ६७ धावा काढून बाद झाला. शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला. या जोडीनंतर कुणी फार चांगली कामगिरी केली नाही. लॅथम तर शून्यावर बाद झाला. यानंतर ग्लेन फिलीप्सला बुमराहने बाद केले. तर, कुलदीप यादवने चॅपमनने बाद केले.

यानंतर न्यूझीलंडचा कोणताही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. त्यांचा संघ ३२७ धावात बाद झाला. आजच्या विजयाचा शिल्पकार हा मोहंमद शमी ठरला. त्याने तब्बल सात गडी बाद केले.

Protected Content