अतिवृष्टीनंतरच्या रोगराईला आळा घालण्यासाठी विशेष काळजी घ्या : ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात १८ गावांमधील सुमारे १८० घरांची पत्रे उडून गेली असून काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तर या गावांमधील शेती शिवारातही मोठी हानी झाली आहे. 

सामरोदसह परिसराचा संपर्क जगाशी तुटला असून या आपत्तीत एक तरूण बंधार्‍यातील पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संवाद साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिलेत. विशेष करून अतिवृष्टग्रस्त भागांसाठी कोरोनाच्या अतिरिक्त १७ हजार लसी देण्यात आल्या असून आवश्यक असणार्‍या औषधी आणि फवारणीची तरतूद करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर ना. पाटील यांनी  जिल्ह्यातील जनतेने अतिवृष्टीनंतरच्या रोगराईला आळा घालण्यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे.  मंगळवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत असल्याने त्यांनी या आपत्तीची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यात आवश्यकता पडल्यास एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. पालकमंत्री प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

महसूल प्रशासनाने दिवसभर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज एका विवरणपत्राच्या माध्यमातून जाहीर केला आहे. या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. यात हिंगणे न.क.- सुमारे २० घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे १० तर लहासर येथे १५ घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे चार घरांची अंशत: पडझड झाली असून जुनोन येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे ९ आणि ८ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे १३० घरांची पत्रे उडाल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. नांद्रा हवेली गावातील एका संपूर्ण गल्लीत पूराचे पाणी शिरले आहे.

यासोबत मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि तिघ्रे वडगाव या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे. तर शेतीची नेमकी किती हानी झाली याची माहिती या विवरण पत्रात देण्यात आलेली नाही. मात्र याबाबतचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, सायंकाळपर्यंत सामरोद, ओझर, टाकरखेडा आदी गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटला आहे. फत्तेपूर ते तळेगावच्या दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे. आज तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधार्‍यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३० वर्षे वय) हा तरूण वाहून गेला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळपासूनच तहसीलदार दीपक शेवाळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांना निर्देश देऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये शाळा, मंदिरे आणि खासगी गोदामांमध्ये ग्रामस्थांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या परिसरात रोगराई होऊ नये म्हणून ना. पाटील यांनी परिसरात फवारणी आणि आवश्यक औषधांची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या नद्या म्हणजेच तापी, गिरणा, वाघूर, बोरी आदींमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हतनूर आणि बोरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून वाघूर मधूनही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे या सर्व नद्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. अतिवृष्टीनंतर रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका असतो. यामुळे पाणी ओसल्यानंतर स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्वच्छतेबाबत मी स्वत: प्रशासनाला सूचना दिल्या असून आपण सुध्दा परिसरात अस्वच्छता असल्यास प्रशासनाला याची तात्काळ माहिती द्यावी. आज झालेल्या अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पंचनामे आणि मदतकार्य करणार्‍या प्रशासनाला आपण मदत करावी असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

 

Protected Content