जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडीतून पडून सुमारे ५० वर्षीय अनोळखी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून नागरिकांनी ओळख पटविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी दुपारी सुमारे २.४७ ते २.४९ वाजण्याच्या दरम्यान ट्रेन क्रमांक २२७२३ श्रीगंगानगर अप एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना संबंधित महिला धावत्या रेल्वेतून खाली पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती ऑन ड्युटी स्टेशन मास्टर एस. व्ही. मोरे यांनी रेल्वे पोलीस चौकी, जळगाव यांना दिली.

अपघातानंतर जखमी महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ. वरद पाटील यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाची वैद्यकीय नोंद (एमएलसी) करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ५० वर्षे असून तिच्या अंगात गुलाबी रंगाची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि हिरव्या रंगाचा परकर होता. तिचा रंग निमगोरा, शरीरयष्टी मजबूत असून केस काळे-पांढरे वाढलेले आहेत. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे ओळख पटेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास अथवा तिची ओळख पटत असल्यास तात्काळ रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथे संपर्क साधावा. ओळख पटल्यास मृत महिलेच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचविणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिनकुमार जगदीश भावसार करीत असून, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.



