Home क्रीडा जळगावची सुवर्णकन्या दिशा पाटीलची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक ; रोमानियातील गोल्डन बेल्ट बॉक्सिंग...

जळगावची सुवर्णकन्या दिशा पाटीलची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक ; रोमानियातील गोल्डन बेल्ट बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या कामगिरीत बॉक्सिंगपटू कु. दिशा विजय पाटील हिने रोमानियामध्ये झालेल्या प्रतिष्ठित ‘गोल्डन बेल्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग टूर्नामेंट’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार खेळाचे प्रदर्शन करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविणाऱ्या दिशाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

रोमानियातील ब्राईला शहरात दि. १० ते १८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील विविध देशांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धेत दिशा पाटीलने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कांस्यपदकाची कमाई करत भारतासह जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले.

दिशाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांनी दिशा पाटील तसेच तिचे वडील विजय पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही दिशाचे अभिनंदन करत तिच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाला बॉक्सिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर तसेच जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख संतोष सुरवाडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी दिशाच्या यशाचे कौतुक करत तिच्या मेहनती, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाचे विशेष कौतुक केले. भविष्यात ती भारतासाठी आणखी मोठी पदके जिंकून देशाचे नाव उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिशा पाटीलच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्रीडा संघटना, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिची कामगिरी नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावून तिने जळगावच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर दिशा पाटीलने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले कांस्यपदक हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून जळगाव जिल्हा, महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


Protected Content

Play sound