आ. गिरीश महाजनांसह भाजपच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन मागे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असून यात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भाजपच्या १२ निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.तत्पूर्वी सभापती निंबाळकर आणि उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मुंबई दौर्‍यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार करण्यासंबंधी विनंती केली. नंतर पत्रकार परिषदेत निंबाळकर यांनी १२ आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा केली.

. या संदर्भातील माहिती देतांना ते म्हणाले, यापूर्वी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने विधिमंडळ सभागृहांच्या कामकाजाविषयी असे निर्देश दिल्याचे आठवत नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करून निलंबन मागे घेत आहोत. तरीही, कोणत्याही सभागृहाचे कामकाज नियमांनुसारच चालले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत.

गेल्या ५ जुलै रोजी विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते. यात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, हरीश पिंपळे, राम सातपुते, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया, अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांचा समावेश होता.

Protected Content